गुजरातमध्ये ८९ जागांसाठी आज मतदान

अहमदाबाद : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या व आगामी लोकसभा निवडणुकीची रंगित तालीम समजल्या जाणार्‍या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवार, १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सौराष्ट्रातील ५४ आणि दक्षिण गुजरातमधील ३५ अशा एकंदर ८९ मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर गुरुवार, ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत ८९ जागांवर मतदान होणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यांत ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. गुरुवारी मतदान होत असलेल्या ८९ जागांसाठी तब्बल ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात यंदा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठी हवा निर्माण केली आहे. १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.

गेली २५ वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मागच्या वेळच्या म्हणजेच २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली होती. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं पण तरीही तो सामना चुरशीचा झाला होता. भाजपनं ९९ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं ८० जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यासाठी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक भाजप नेत्यांनीही प्रचारसभांना संबोधित केले. २७-२८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर होते. नेत्रंग, खेडा, पालिताना, अंजार, जामनगर आणि राजकोट येथे त्यांनी सहा प्रचारसभांना संबोधित केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पक्षाचा जोरदार प्रचार केला. तसेच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यास अन्य नेत्यांनी प्रचाराचे रण गाजवले.

पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे देवभूमी द्वारका जिह्यातील खंभलिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेले कुंवरजी बावलिया, मोरबीचे ‘नायक’ कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा रोड शो
पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० पर्यंत हा रोड शो असेल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी १०.३० वाजता रोड शो करतील.