तरुण भारत लाईव्ह न्युज यावल : तालुक्यातील वढोदा येथे एका वृद्ध महिलेला लिक्विडने भांडे घासून चमकून दाखवत सोन्याची चैनपोतदेखील चमकावून देण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने हातचलाखी करीत 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. हा प्रकार निर्दशनास आल्यावर यावल पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा
वढोदा, ता.यावल येथील सुरेश नामदेव चौधरी यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या गावात एक जण जुने दागिण्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आला व चौधरी यांच्या पत्नी उज्वला चौधरी यांनी त्याच्याकडून पितळी व तांब्याच्या भांड्यांना पॉलिश करवून घेतली व सोन्याचे दागिने असतील तर पॉलिश करून देतो, असे अज्ञात तरुणाने सांगितल्यानंतर उज्वला चौधरी यांनी 50 हजार रुपये किंमतीची व अडीच तोळे वजनाची सोन्याची चैनपोत पॉलिशसाठी दिली. तरुणाने ती एका स्टीलच्या डब्यात लिक्विड आणि हळद टाकून ठेवली आणि सांगितले की हा डबा गॅसवर गरम करा व थंड झाल्यावर ते उघडून चैन काढून घ्या, असे सांगून भामट्याने काढता पाय घेतला. डबा उघडल्यानंतर त्यात सोन्याची चैन-पोत नव्हती. सोन्याची चैन लांबवल्याचे लक्षात आल्यानंतर याव पोलिसात सीबीझेड (दुचाकी 2721) वरील अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.