तरुण भारत लाईव्ह । २६ मे २०२३। चिंचखेडे, माळ पिंपरी, हिवरखेडे, गोंडखेल, पळासखेडे या भागातील शेतकरी वर्ग वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे. मे महिन्याच्या अखेरीस पाऊस येईल या आशेने शेतकरी खरीपपूर्व तयारीत व्यस्त आहे. शेतातील झाडेझुडपे, निरुपयोगी खोडे काढणे, शेतात शेणखताची वाहतूक करणे, ट्रॅक्टरने जमिनीची नांगरणी वखरणी करणे, मजुरांकडून कचरा वेचणे, ट्रॅक्टरच्या रोटावेटरने जमीन बारीक करण्याकडे शेतकर्यांचा कल अधिक दिसून आला. बैलजोडीपेक्षा यांत्रिकी पद्धतीने कामे आटोपण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.
जिल्ह्यातील 95 टक्के शेतकरी कर्जबाजारी आहे. त्यातच त्याला निसर्गसुद्धा साथ देताना दिसत नाही. पावसाची अनियमितता, मजुराची रोजंदारी, बियाणे, रासायनिक खते यांच्या वाढलेल्या किमती यासाठी पैशाचे पीक म्हणून पांढरे सोने म्हणजेच कापसाची लागवड शेतकरी करतो.
अधिक तापमान कायम राहिल्याने शेतकर्यांना धूळपेरणी करणे लांबवावी लागत आहे. यावर्षी विहिरीत पाणी नसल्याने ठिबक सिंचनावर कापूस लागवड शेतकर्याला करता येणार नाही, कापूस पेरणीसाठी 33 फुट, 42,32,51 फुट इत्यादी प्रकारच्या फुल्या पाडतात. या परिसरात 80-85 टक्के शेतीत कापूस व उर्वरित पंधरा-वीस टक्केमध्ये मका, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, उडीद ही पिके शेतकरी घेतात.
कापूस या पिकाची जेवढ्या लवकर लागवड कराल तेवढे अधिक उत्पन्न मिळते. काही सधन शेतकरी कोरड्या जमिनीत फुल्या पाडून कपाशीची लागवड करतात कोरड्या जमिनीतील पेरणी मग ती कोणत्याही बियाण्याची असो, ही पेरणी बहुतांशी त्यानंतर पडणार्या पावसावर अवलंबून असते.
थोडक्यात काय तर कोरड्या जमिनीत पेरणी केल्यानंतर 33 टक्के यशाची खात्री असते. म्हणूनच शेतकरी कोरड्या जमिनीत पेरणी करायला धजत नाही. त्याकरिताच भरपूर पण रिमझिम पाऊस पडणे गरजेचे असते अशाच पावसाची शेतकरी वाट पाहत आहे.