Sukha Duneke : वॉन्टेड गँगस्टर सुक्खाचा खेळ खल्लास

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतात तणाव वाढला आहे. अशातच पंजाबमधील फरार गँगस्टर सुखदुल सिंह याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, लॉरेन्स बिश्नोई गँगने कॅनडातील पिनीपेग सिटीमध्ये भारतातील फरार गँगस्टर सुखदुल सिंहच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे.

पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, सुक्खा २०१७ मध्ये कनाडाला पळून गेला होता. तिथून तो खंडणीचं रॅकेट चालवत होता. दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांत एनआयएने मंगळवारी ४० हून अधिक कुख्यात गुंडांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात सुक्खाचाही समावेश होता.

सुक्खा हा बांबिहा टोळीशी संबंधित होता. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीशी त्याचं वैर होतं, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पंजाबच्या मालियान गावात २०२२ मध्ये कबड्डी सामन्यांदरम्यान कबड्डीपटू संदीप नगल अंबिया याची हत्या झाली होती. या हत्येत सुक्खा हा आरोपी होता. अमृतसरमधील एका नातेवाईकाच्या घरात त्याने मारेकऱ्यांना आश्रय दिला होता.

सुक्खाला पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली मागील वर्षी जूनमध्ये पंजाब पोलीस दलातील दोघांवर एफआयआर दाखल झाला होता. पंजाब पोलिसांच्या एडीटीएफच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला होता.

बिश्नोई टोळीनं घेतली जबाबदारी
सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून टोळीनं सुक्खाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमधून टोळीनं आणखी काही कुख्यात गुंडांना धमकी दिली आहे. कितीही पळा, तुमच्या पापाची शिक्षा मिळणारच, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.