गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध, वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. विधानसभेत आज राज्यातील विमानतळाबाबत चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध झालं असल्याचं दिसून आलं आहे.

अधिवेशनामध्ये आज आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खाते वाटप करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा भार कमी करण्यासाठी खातेवाटप केलं जातं. मात्र प्रत्येक दिवशी खातेवाटप करू नये अशी माझी विनंती आहे. कारण मंत्र्यांना प्रश्न विचारला तर त्याबाबत त्यांना उत्तर देता येत नाही. आम्हाला मंत्र्यांकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर आमची देखील नाराजी होते. त्यामुळे मंत्र्यांनी पक्का अभ्यास करून यावा”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “आदित्य ठाकरे खूप जास्त अभ्यास करून आले आहे. आम्ही मूळ प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.मात्र काही प्रश्न बाहेरचे असतात ते ऐनवेळी समोर येतात. जन्मतःच कुणी हुशार नसतं. विमानतळाचा विषय सुरू असताना तुम्ही 34 हेक्टर जमीन कुठे आहे? हा प्रश्न विचारता. तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणारच नाही. त्यामुळे जे कोणी स्वतःला हुशार म्हणत असेल तो शेतकऱ्याचा पोट्टा आहे. जमिनीत कुठे काय पिकतं सर्व काही त्याला माहित आहे”, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.