वारिस पंजाब दे

कानोसा

– अमोल पुसदकर

नुकताच Punjab पंजाबमधील अजनाना पोलिस स्थानकावर ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेच्या समर्थकांनी, जे स्वत:ला खलिस्तान समर्थक म्हणवतात, त्यांनी हल्ला केला.

त्यात सहा पोलिस शिपाई जखमी झाले. पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ फोफावेल की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. वारिस पंजाब दे ही अभिनेता दीप सिद्धू याने स्थापन केलेली संघटना आहे. हा तोच दीप सिद्धू आहे, ज्याने 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने उपद्रवी लोकांना घेऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यावर हल्ला केला होता. पुढे हा दीप सिद्धू एका कार अपघातात मरण पावला. त्यानंतर त्याची जागा अमृतपाल सिंग नावाच्या एका व्यक्तीने घेतलेली आहे. हा अमृतपाल सिंग दुबई येथे ट्रान्सपोर्टचा व्यापार करीत होता. दुबईवरून परत आल्यानंतर त्याने वारिस पंजाब दे या संघटनेचे मुख्य पद स्वीकारले.

आता तो खलिस्तान राज्याची पुन्हा मागणी करीत आहे. हा अमृतपाल स्वत:ला भारतीय सुद्धा मानत नाही. तो म्हणतो, माझ्याजवळ पासपोर्ट भारतीय आहे म्हणून मी भारतीय आहे असे नाही. तो म्हणतो की, Punjab पंजाब हे भारताचे अविभाज्य अंग नाही. अशा या अमृतपाल सिंग याच्या जवळचा साथीदार तुफान सिंग याला पोलिसांनी एका अपहरणाच्या केसमध्ये अटक केलेली होती. त्याला सोडावे यासाठी वारिस पंजाब दे या संघटनेच्या खलिस्तानी कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकावर हल्ला केला. स्वत: अमृतपाल सिंग पोलिस स्टेशनवर गुरू ग्रंथ साहिब असलेली पालखी घेऊन गेला होता. पालखीच्या आड त्याचे हजार समर्थक तेथे जमले व त्यांनी पोलिस स्थानकावर हल्ला केला. तेथील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून तुफान सिंगला दुसर्‍या दिवशी सोडून देण्यात आले. लोक आता अमृतपाल सिंगकडे भिंद्रांवाले भाग दोन म्हणून पाहत आहेत. असे झाले तर पंजाब पुन्हा एकदा अशांत होऊ शकतो. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, जे लोक गुरू ग्रंथ साहिबच्या आडून पोलिस स्थानकावर हल्ला करतात, ते लोक पंजाब आणि पंजाबीयत याला समजू शकत नाही व ते पंजाबचे वारिस सुद्धा होऊ शकत नाहीत. एकेकाळी पंजाबमध्ये जरनेलसिंग भिंद्रानवाले याचा कहर होता. तो सुवर्ण मंदिरात घुसून बसलेला होता व तेथून आपल्या अतिरेकी कारवाया चालवत होता. शेवटी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना लष्कराला सुवर्ण मंदिरात घुसविणे भाग पडले व सैन्याने सुवर्ण मंदिराच्या आत जाऊन या भिंद्रानवालेच्या समर्थकांचा व भिंद्रानवालेचाही खात्मा केला.

या घटनेला आता बराच काळ लोटलेला आहे. खलिस्तानची मागणी आता शांत झालेली आहे असे वाटते. परंतु मधूनमधून काही स्टेजवरून खलिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या जातात. 1947 साली ज्यावेळेला पाकिस्तान निर्माण झाले, त्याच वेळेला जर मुसलमानांसाठी पाकिस्तानसारखे राष्ट्र निर्माण होऊ शकते तर शिखांसाठी खलिस्तान हे राष्ट्र निर्माण का होऊ शकत नाही, अशा पद्धतीचा सूर खलिस्तान समर्थकांचा होता. पाकिस्तानने त्याही वेळेला या खलिस्तान समर्थकांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. ज्यावेळेस भिंद्रानवाले सुवर्ण मंदिरात लपून बसलेला होता त्याही वेळेला पाकिस्तान भारतावर आक्रमण करेल व तुम्ही सुद्धा भारतामध्ये अंतर्गत युद्ध सुरू करा अशा पद्धतीचा प्लॅन आयएसआय व भिंद्रानवाले याचा होता. आता सुद्धा जे खलिस्तान समर्थक पाकिस्तानात बसलेले आहेत, त्यांना पाकिस्तान सातत्याने पैसा पुरवीत असतो. दर दोन-चार दिवसाआड पाकिस्तानातून उडवलेले ड्रोन Punjab पंजाब प्रांतामध्ये ठिकठिकाणी पकडले जात असतात. कॅनडा ही खलिस्तान समर्थकांची दुसरी भूमी आहे. कॅनडातून सुद्धा खलिस्तानचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर केला जातो. इतरही काही देशांमध्ये या खलिस्तानचे समर्थक बसलेले आहेत, जे भारतामध्ये खलिस्तानवादी शक्तींना पैसा पुरवीत असतात. भारतात शिखांवर कसे अत्याचार करण्यात येतात अशा पद्धतीच्या जाहिराती कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये दाखविल्या जातात. ज्या जाहिराती विशेषत: शीख समाजाच्या तरुणांना ज्यांचे वय वीस ते पंचवीस वर्षे आहे यांना केंद्रित करून दाखविल्या जातात. त्यामुळे तरुणांचे डोके फिरविण्यासाठी याचा उपयोग केला जातो व या जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे फंडिंग गोळा केले जाते. या जाहिरातींवर ज्या कॉमेंट्स असतात त्या विशेषत: पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून केल्या गेलेल्या आहेत.

Punjab पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार, या हजार लोकांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. यांचा उद्देश पंजाबला अस्थिर करणे आहे. परंतु पंजाब अस्थिर होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. परंतु चिंतेची गोष्ट ही आहे की, सर्व काही व्यवस्थित सुरू असताना, देश प्रगतिपथावर जात असताना अशा प्रकारचे फुटीरवादी आंदोलन एखाद्या प्रांतात होणे की ज्या आंदोलनाला विदेशी राष्ट्रांमध्ये बसलेल्या लोकांचा सुद्धा पाठिंबा आहे, ही चिंतेची बाब आहे. काश्मीरमधील ब्राह्मणांना तेथील नवाबाने मुसलमान होण्यास फर्मावले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, आमचे राजे गुरुतेग बहादूर आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस गुरुतेग बहादुरांना हे समजले की, या लोकांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात आहे त्यावेळेस ते म्हणाले की, तुम्ही नवाबाला सांगा की, गुरुतेग बहादूर जर मुसलमान बनणार असतील तर आम्हीही मुसलमान बनू. म्हणून गुरुतेग बहादुरांनी लहानग्या गुरुगोविंद सिंग यास विचारले की, धर्मासाठी बलिदान करण्यासाठी सगळ्यात चांगला मनुष्य कोण आहे. त्यावेळेस गुरुगोविंद सिंग आपल्या वडिलांना म्हणाले की, धर्मासाठी बलिदान करण्यासाठी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोणीही नाही. आणि त्यानंतर गुरुतेग बहादुरांनी आपले बलिदान दिलेले आहे. त्यामुळे पंजाब हा गुरुतेग बहादूर यांचा आहे. गुरुगोविंद सिंगांचा आहे, बंदा बैरागींचा आहे, धर्मासाठी बालपणीच मृत्यूला कवटाळणार्‍या फतेह सिंग, जोरावर सिंग यांचा आहे, भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्‍या शेकडो शीख सैनिकांचा आहे. अशा पंजाबचे वारिस म्हणजे वंशज खलिस्तानवादी, फुटीरवादी होऊच शकत नाहीत. पंजाबचे वंशज शीख गुरूंना मानणारे, भारतीय सैन्यामध्ये पराक्रम गाजविणारे व भारताच्या प्रगतीत आपला वाटा देणारे लोकच होऊ शकतात तेच खरे ‘वारिस पंजाब दे’ आहेत.

– 9552535813

(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)