शासकीय कामात दिरंगाई, लिपिकाच्या सेवा पुस्तकात ताकीद; वन विभागाच्या आदेशानुसार कारवाई

#image_title

कासोदा, एरंडोल : सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी एरंडोल येथील तत्कालीन लिपिक नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शासकीय कर्मचारी गटात खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांनी सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांच्याकडून माहिती मागितली होती, परंतु विभागाने अपूर्ण माहिती दिली. यामुळे महाजन यांनी प्रथम अपील दाखल केले, मात्र अधिकारी एस.वाय. शेख यांनी सुनावणी न घेतल्यामुळे द्वितीय अपील राज्य माहिती आयोग नाशिक कडे दाखल करण्यात आले. आयोगाने कारवाई करत शासन परिपत्रकाचा भंग केल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि लिपिकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

चौकशीअंती विभागीय वन अधिकारी गजेंद्र हिरे यांच्या आदेशानुसार लिपिक नितीन पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर, राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाच्या आदेशानुसार पाटील यांना शासकीय कामात दिरंगाई केल्यामुळे सेवा पुस्तकात सक्त ताकीद देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.