Wasim Jaffer : T20 विश्वचषकात टीम इंडिया खळबळ माजवेल, पण रोहितला हे मान्य करावं लागेल !

T20 विश्वचषक स्पर्धेचे सराव सामने सुरू झाले असून 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुढील एका महिन्यात २० संघ विजेतेपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियालाही 13 वर्षांचा दुष्काळ संपवून यावेळी ट्रॉफी भारतात आणायची आहे. यासाठी भारतीय संघाने न्यूयॉर्कमध्ये पोहोचून तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाला ५ जूनपासून आयर्लंडविरुद्ध स्पर्धेची सुरुवात करायची आहे. याआधी संघाला बांगलादेशविरुद्ध सराव सामनाही खेळायचा आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने टीम इंडियाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, ज्याचा फायदा भारताला स्पर्धेत होऊ शकतो.

टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीची सर्वाधिक चर्चा आहे. भारतासाठी 31 कसोटी सामने खेळलेल्या वसीम जाफरने या स्पर्धेत टीम इंडियाने विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालसोबत सलामी करावी, असा सल्ला दिला आहे.

रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. ते म्हणाले की, टीम इंडियाने सुरुवातीनुसार या दोन फलंदाजांचा फलंदाजीचा क्रम ठरवावा. जाफरने आपल्या सोशल मीडियावर या सल्ल्यामागचे कारण सांगितले की, रोहित फिरकीविरुद्ध चांगली फलंदाजी करतो.

जाफरच्या बोलण्यात किती तथ्य आहे?
टीम इंडियासाठी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहित शर्माचे आकडे पाहिले तर वसीम जाफरचे म्हणणे खरे वाटते. रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या स्थानावर 12 सामन्यात फलंदाजी केली आहे. या काळात त्याने 39 च्या सरासरीने 315 धावा केल्या आहेत आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना टी-20 विश्वचषकातील त्याची सर्वोत्तम धावसंख्याही आली. 2010 च्या T20 विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 79 धावा केल्या होत्या.

दुसरीकडे, कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामी करताना शानदार फलंदाजी केली आहे. सलामी करताना कोहलीने 9 सामन्यात फलंदाजी करत 57 च्या उत्कृष्ट सरासरीने 400 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये केलेल्या १२२ धावांची सर्वोच्च धावसंख्याही या क्रमांकावर आली आहे. याशिवाय यशस्वी जयस्वालने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सलामी करताना शतक झळकावले आहे. या आकडेवारीनुसार जाफरचा सल्ला भारतीय संघासाठी प्रभावी ठरू शकतो.

मॅथ्यू हेडननेही दिला हाच सल्ला
केवळ जाफरच नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनही हेच मानतो. आयपीएलदरम्यान स्टार स्पोर्ट्सवर विश्लेषण करताना हेडननेही भारतीय संघाला हाच सल्ला दिला होता. टी-२० विश्वचषकात विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत भारतीय संघाने सलामी करावी, असे ते म्हणाले होते. सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार रोहित शर्माला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकते, असेही हेडन म्हणाला होता. रोहित शर्माचे कौतुक करताना तो म्हणाला होता की तो असा फलंदाज आहे जो कुठेही खेळू शकतो, त्यामुळे भारतीय संघाला कोणतीही अडचण येणार नाही.