---Advertisement---
जळगाव : दिवाळीसाठी पैसे आणि वस्तू द्या असे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या वॉचमनने आरोही इंद्रकुमार ललवाणी (३८, रा. बालाजी हाईटस्, मोहाडी रोड) या महिलेवर चाकूने वार केले.
हल्ला करणारा गोकूळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) हा पूर्वी या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होता. ही घटना सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) घडली. यावेळी मोठी गर्दी होऊन नागरिकांनी हल्ला करणाऱ्याची धुलाईदेखील केली.
संशयित गोकूळ राठोड हा १३ ऑक्टोबर रोजी इमारतीमध्ये आला व आरोही ललवाणी यांच्या घरी जाऊन पिण्यासाठी त्याने पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर त्याने महिलेकडे दिवाळीसाठी पैसे व वस्तू द्या, अशी मागणी केली. त्यावेळी तो घरात शिरला. त्याला बाहेर काढत असताना त्याने चाकूने महिलेच्या हाताच्या पंजावर वार केले.
जमावाकडून चोप
महिलेने आरडाओरड केल्याने इमारतीमधील रहिवासी आले. यावेळी त्याची चांगलीच धुलाई केली. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल वाघ व त्यांचे सहकारी पोहचले. या प्रकरणी आरोही लालवाणी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोकूळ राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.