जळगावात गाडगेबाबा चौकात डांबरी रस्त्याखालून वाहतेय पाणी

जळगाव : संभाजी नगर पसिरातील संत गाडगेबाबा चौकात डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या खालील जलवाहीनीला गळती लागल्याने पाणी रस्त्यावरून खळखळा वाहत गटारीत जात आहे. याबाबत महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांसह पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी दूर्लक्ष केले आहे.
संभाजी नगरात संत गाडगेबाबा चौकातील रस्त्याचे काही महिन्यांपुर्वी डांबरीकरण केले. डांबरीकरणाचा एक थर मारलेला आहे. तर महाबळ ते गाडगेबाबा चौकापर्यतच्या रस्त्यावरही डांबरीकरणाचा एक थर मारलेला आहे. मात्र चौकात डांबरीकरणाचे योग्य नियोजन केलेले नाही.
जलवाहीनीला लागली गळती
या चौकात डांबरीकरण केलेल्या रस्त्याखाली असलेल्या जलवाहीनीला गळती लागली आहे. गळती मोठी असल्याने पाणी उकळत्या पाण्याप्रमाणे बाहेर येत आहे. बाहेर आलेले पाणी रस्त्याने वाहत जावून गटारीत जात आहे.
प्रभाग अधिकाऱ्यांसह पाणी पुरवठा विभाग निद्रिस्त
प्रभागातील समस्या सोडविणे, सुविधांची देखभाल करणे, करांची वसुली करणे यासारख्या विविध कामांसाठी मेहरून तलावाजवळ प्रभाग क्रमांक 3 चे कार्यालय आहे. तर भाऊंच्या उद्यानाजवळ पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यालय आहे. मात्र प्रभाग अधिकाऱ्यांसह पाणी पुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष्ा अभियंत्यांना याबाबत माहितीच नाही.
दुरूस्तीसाठी खोदावा लागणार रस्ता
चौकात गळती लागलेल्या जलवाहीनीच्या दुरूस्तीसाठी डांबरीकरण केलेला रस्ता जेसीबीने खोदावा लागणार आहे. त्यानंतर गळती शोधून ती दूरूस्त करावी लागणार आहे. त्यानंतर खोदलेल्या रस्त्यांचे त्वरीत डांबरीकरण केले तरच महापालिका प्रशासन गतीमान प्रशासन असल्याचा प्रत्यय करदात्यांना येईल. अन्यथा ‌‘महापालिकेचे काम अन्‌‍ वर्षानुवर्ष थांब’ असा सुरू नागरीकांना लावावा लागेल.

तुम्ही व्हॉलमनला फोन करा : संजय पाटील, अभियंता, पाणी पुरवठा महाबळ टाकी
याबाबत महाबळ कॉलनीतील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत अमृतच्या ठेकेदाराशी बोलावे लागेल. उद्या बघतो. तुम्हाला तेथील व्हॉलमन अशोक मराठे यांचा नंबर पाठवतो त्याच्याशी तुम्ही बोलून घ्या. असे सांगीतले.

साहेबांना कळविले आहे, उद्या बघू
याबाबत व्हॉलमन अशोक मराठे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत साहेबांना कळविले आहे. उद्या गुरुवारी बघू. 12 इंची मुख्य जलवाहिनी आहे. दुरुस्तीचे साहित्य मिळाले तर काम सुरू करू. लहान गळती असेल तर दोन तीन तासात दुरूस्ती होईल. मोठी असेल तर अर्धा दिवस लागण्याची शक्यता आहे.