गिरणा नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात २० कोटी लिटर पाणी वाया; वाचा सविस्तर

नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या चालकाने नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस शोध मोहिम राबवली. यासाठी पाणी पातळी कमी करण्यासाठी ठेंगोडा साठवण बंधाऱ्याजवळील ठेंगोडा, लोहोणेर व देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी संरक्षित सुमारे २०० क्यूसेक पाणीसाठा पहाटे सहापासून दुपारी तीनपर्यंत सोडण्यात आला. मात्र ड्रग्ज शोधण्याच्या नादात वीस कोटी लिटर पाणी वाया गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या चालकाने ठेंगोड्यातील गिरणा नदीपात्रात फेकलेल्या ड्रग्जच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी पाणी पातळीमुळे थांबवलेली शोधमोहीम रविवारी पुन्हा स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने सुरु केली. मात्र, पाणी पातळी कमी करण्यासाठी ठेंगोडा साठवण बंधाऱ्याजवळील ठेंगोडा, लोहोणेर व देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी संरक्षित सुमारे २०० क्यूसेक पाणीसाठा पहाटे सहापासून दुपारी तीनपर्यंत सोडण्यात आला. या वाया गेलेल्या पाण्यामुळे आता पुढील तीन महिन्यांसाठीचा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा विसर्ग कमी करण्यात आला.

ड्रग्जचा साठा शोधण्यासाठी मुंबई येथील साकीनाका पोलिसांच्या पथकाने रविवारी ललित पाटीलचा चालक सचिन वाघला सोबत घेत पुन्हा शोधमोहीम राबवली. स्थानिक पोहणाऱ्यांना मदतीला घेत दोन टप्यात शोधमोहीम राबवली मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. यावर्षी अल्प पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. ठेंगोडा बंधाऱ्यावरील पाणी सोडण्यात येत असल्याचे समजताच शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध करत पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता पाणी सुरुच ठेवले. अखेर शेतकरी बंधाऱ्यावर जाऊन विरोध करू लागल्याने दुपारी तीन वाजता बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र, तोपर्यंत पाणी वाया गेल्याने केवळ मृतसाठा शिल्लक आहे.