”काश्मीरसाठी आम्ही भारतासोबत ३०० लढाया लढू” पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान

नवी दिल्लीः पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी कलम ३७० वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तानचे लोक काश्मीरसाठी ३०० वेळेस लढाई लढण्यासाठी तयार आहेत. काकर यांनी हे विधान गुरुवारी केलं आहे.

पंतप्रधान काकर पुढे म्हणाले, पाकिस्तानवर तीन वेळा युद्ध लादलं गेलं. परंतु काश्मीरसाठी पाकिस्तानी लोक ३०० लढाया लढण्यासाठी तयार आहेत. काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातली नस आहे… या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या विधानाशी पाकिस्तानी लोक सहमत नसल्याचं दिसून येतंय. रियल एंटरटेन्मेंट नावाच्या यू ट्युब चॅनेलने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी युवक म्हणतो, आम्ही ३०० लढाया का लढायच्या? तुम्हाला युद्धावर बोलण्याचा अधिकार नेमका दिला कुणी? निवडणुका लावण्यासाठी काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त केला आहे परंतु निवडणुका घेण्यासंबंधी तुम्ही काहीच बोलत नाहीत.
एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, विधानसभेच्या विशेष सत्रात बोलताना काकर म्हणाले की, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेचा एक इंचही भूभाग कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके परत घेण्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी पुढेही भाष्य केलं.
“काश्मीर ही पाकिस्तानची रक्तवाहिनी आहे. काश्मीरशिवाय ‘पाकिस्तान’ हा शब्द अपूर्ण आहे. पाकिस्तान आणि काश्मीरमधील लोक आत्मीयतेने बांधलेले आहेत. आम्ही सुख-दु:ख एकमेकांना शेअर करतो. काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तान उदासीन राहू शकत नाही… काश्मीर आमच्या रक्तात आहे. त्यामुळे गरज पडली तर तीनशे युद्ध करु, असं विधान काकर यांनी केलं.