पुणे : गेल्या २४ तासांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उनं सावलीचा खेळ सुरु आहे. अमरावतील, बुलढाणा, सोलापूर, जळगावसह काही ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होवून उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या ४८ तासात वातावरणात अनेक बदल दिसणार आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाचा अंदाज देखील आहे.
राज्यातील काही ठिकाणी उन्हामुळे लाहीलाही होत असतांना. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील 48 तासांतमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला.
शुक्रवारी रात्री विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस अमरावती विभागात झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. शेतातील काढून ठेवलेले पीक पावसामुळे खराब होण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, साखर खर्डा परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदा बियाणे पिकांचे मोठं नुकसान झाले.