राज्यासाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे, असा आहे हवामानाचा अंदाज

मुंबई :  दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ७२ तास हे राज्यासाठी महत्त्वाचे असून या दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या ७२ तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, त्यामुळे या विभागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत पावासाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

आज (१ जुलै) मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सिंधुदुर्गात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या (२ जुलै) पुण्यातील घाट माध्यावर पाऊस कोसळेल. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातुरात पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबारमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.