weather update : उत्तर भारतात थंडीची लाट; कोकणासह ‘या’ भागात आजही पावसाची शक्यता

देशभरात थंडीचा प्रभाव दिसू लागला आहे. बहुतांश राज्यांच्या कमाल तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण उत्तर भारताच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मिचाँग चक्रीवादाळाचा प्रभाव आता कमी झाला आहे. काही ठिकाणचा पाऊस कमी झाला आहे, तर अनेक राज्यांमध्ये हळूहळू थंडी वाढू लागली आहे.

उत्तर भारतात थंडी वाढली

तर हवामान विभागाच्या माहितीनुसार आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये दाट धुक्यांसह गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

त्याचबरोबर आजही काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा किनारी भाग आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यामध्ये कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.

तर राज्याच्या काही भागात येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता देखील आहे. पुणे आणि मुंबईमध्ये तापमानात काही अंशी घट झाल्याचे दिसून येत आहे.