लग्नसोहळ्याची तयारी

तरुण भारत लाईव्ह । अनुराधा मुजुमदार । लग्न सोहळ्याची तयारी या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन बर्‍हाणपूर येथे विश्र्वास देशपांडे यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ, लग्नाच्या तयारीसाठी क्रमवार विधी असलेल्या या पुस्तकाचे अंतरंगही तेवढेच आकर्षक आहे. माझ्या मुलीचे लग्न ठरले, मग लग्नात कोणकोणते विधी असतात आणि त्यांची तयारी कशी करावी, असे प्रश्र्न मला पडले. मग त्यासंदर्भात मी अनेक जाणकार लोकांकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि ती माहिती लिहून ठेवली. लग्नातले विधी किती महत्त्वाचे असतात आणि ते श्रद्धेने करणेदेखील किती आवश्यक असतात हे माझ्या लक्षात आले.

लग्न हा केवळ एक सोहळा नाही तर तो आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा संस्कार आहे आणि त्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्याचे अत्यंत डोळसपणे नियोजन केले होते. मी काढलेल्या या टिपणांच्या आधाराने माझ्या मुलीचे लग्न उत्तमप्रकारे झाले. त्यानंतर आमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना या माहितीचा त्यांच्याकडील लग्नात खूप उपयोग झाला. त्यांच्याकडील लग्नकार्येही उत्तमप्रकारे झाली. ही सगळी टिपण स्वरूपातली माहिती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्यास सर्व समाजालाच त्याचा उपयोग होईल, असा आग्रह मला सर्वांनी केला. त्यातूनच हे पुस्तक आज मूर्त स्वरूपात आपल्यासमोर आले आहे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबे छोटी झाली आहेत. घरात अनुभवी किंवा वयोवृद्ध माणसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लग्न सोहळ्यातील विविध विधी आणि त्यांचे महत्त्व कोण समजावून सांगणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लग्नासाठी तयार असणार्‍या वधू-वराच्या मनोविकासाची भूमिका मांडण्यासाठी निश्र्चितपणे या पुस्तकाचा लाभ त्यांना होईल.

आधुनिकतेकडे वाटचाल करणार्‍या आपल्याच नव्या पिढीला विवाहाचा अर्थ स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांनी वाचायला हवे.
सहजीवनाचे मूल्य सांगणारे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारे हे पुस्तक म्हणजे संस्कृतीदर्शक आहे. या पुस्तकाला परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज अंजनगाव सुर्जी (अमरावती) यांचे आशीर्वाद स्वरूप मनोगत आहे. अनुरूप विवाह संस्थेच्या संचालिका गौरी कानिटकर यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकाची केवळ अनुक्रमणिका पाहिली तरी त्यातील विविध विषयांचे वैविध्य लक्षात येते. विशेषत्वाने यात महाराष्ट्रातील लग्न पद्धतीचा समावेश आहे. लग्नविधींची माहिती, सप्तपदीचे महत्व, संसाराची अष्टसूत्री, मंगलाष्टके, उखाणे, ओव्यांचे लग्न सोहळ्यातील महत्त्व, विहीण म्हणणे, लग्नाचे प्रकार, त्यासंबंधी वापरले जाणारे काही नवे-जुने व नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ लग्नपत्रिकेचे स्वरूप यासारखी सगळी माहिती या पुस्तकात सुटसुटीतपणे मांडली आहे.

लग्न सोहळ्याची तयारी करताना आई-वडिलांना आणि लग्नाला सामोरे जाणार्‍या वधूवरांना हे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहेच, पण त्यांच्या मनोविकासाची भूमिका तयार करणारे आहे. सोपी आणि ओघवती भाषा हे याचे वैशिष्ट्य आहे. लग्न सोहळ्यातील कुठलीही गोष्ट सुटू नये ही दक्षता घेतली आहे. माझी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत पण माझा मूळ पिंड हा कवयित्रीचा असल्यामुळे पुस्तकात विविध ठिकाणी माझ्या पद्यरचना आल्या आहेत. मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथे आम्ही वास्तव्यास असलो तरीही मराठी मातीशी जोडलेली नाळ कायम आहे. यापूर्वी प्रकाशित झालेल्या अंतर्वाटा या माझ्या काव्यसंग्रहास वसंत राशिनकर अखिल भारतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. लग्न सोहळ्याची तयारी हे पुस्तक स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले असून या पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. एकंदरीतच संग्रही असावे आणि ज्यांच्याकडे मुला-मुलींचे लग्न ठरले आहे त्या स्नेही मंडळींना भेट द्यावे असे हे पुस्तक आहे.