---Advertisement---
यावल : बोरावल गेट भागातील एका शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात माथेफिरूने केळीला देण्यासाठी ठेवलेल्या पाण्यात तणनाशक मिसळले. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे १,२०० केळीचे खोड जळाले असून, त्यांचे अंदाजे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील रहिवासी लीलाधर उर्फ बापू प्रल्हाद महाजन (वय ५२) यांचे बोरावल रस्त्यालगत गट क्रमांक ११६४ मध्ये शेत आहे. त्यांनी येथे चार महिन्यांपूर्वी केळीची लागवड केली होती. केळीची वाढ चांगली झाली होती आणि ते ठिबक सिंचन (ड्रीप) पद्धतीने त्यांना औषधे देत होते.
त्यासाठी त्यांनी शेतात २०० लिटरचे पाण्याचे बॅरल भरून ठेवले होते. अज्ञात व्यक्तीने याच बॅरलमधील पाण्यात तणनाशक मिसळले. हे पाणी ठिबक सिंचनाद्वारे केळीच्या झाडांना दिल्यावर, एकाच दिवसात १,२०० खोड खराब होऊन जमिनीवर कोसळले. पुढील तपास सुरु आहे.