मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यभरात हिंसक आंदोलन पेटल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. सुप्रिया सुळेंच्या सरकारवरील टीकेला उत्तर देताना ४० वर्षात तुमच्या वडिलांनी मराठा आरक्षणासाठी काय केले असा सवाल करत आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, ४० दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी सरकारने काय केले असा प्रश्न सुप्रिया सुळे विचारतात पण १९८० माझा मराठा समाज आरक्षण मागतोय. तेव्हापासून आपले वडील शरद पवार यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले. सत्ता आपल्या वडिलांकडे आणि घराण्याकडे दिली. आज ४० वर्षात आपण समाजासाठी काय केले हे मी मराठा समाजाची मुलगी म्हणून तुम्हाला विचारते. ४० वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी चांगले केले असते तर माझ्या तरुण बांधवांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती असं त्यांनी म्हटलं.
तसेच मनोज जरांगे पाटीलांचे उपकार माना, आज त्यांनी मराठा समाज एकत्र आणला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आणि तेच आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवले. त्यानंतर तुमचे वडील शरद पवार यांच्या कृपेने महाराष्ट्रावर लादलेले सरकार आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला मिळालेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा आपण मूग गिळून गप्प का होता या प्रश्नाचे उत्तर राज्यातील जनतेला अपेक्षित आहे असा टोलाही आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.
आम्ही सत्ताधारी आमदार असलो तरी आरक्षणासाठी सरकारला जाब विचारू, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण तुम्ही समाजातील तरुण मुलांच्या भावना भडकवण्याचे काम करू नये अशी विनंतीही आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळेंना केली.