Mahashivratri 2025 : महाशिवरात्री हा सण भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. हा सण आज, बुधवारी देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. या दिवशी, शिवभक्त भगवान शिवाची पूजा-अर्चा करून त्यांना बेलाची पाने, दूध आणि विविध नैवेद्य अर्पण करतात. बरेच भक्त उपवास ठेवून भगवान शिवाची उपासना करतात. उपवासादरम्यान शरीराला योग्य ऊर्जा मिळावी यासाठी काही विशिष्ट पदार्थ खाणे गरजेचे असते. विशेषतः, उपवास सोडताना योग्य आहार घेतल्यास शरीराला चांगला पोषण मिळतो आणि थकवा दूर होतो. चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्रीचा उपवास सोडताना कोणते पदार्थ खावेत.
हंगामी फळे
महाशिवरात्रीचा उपवास सोडताना तुम्ही सफरचंद, केळी, डाळिंब, संत्री यासारखी हंगामी फळे खाऊ शकता. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. फळे खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीर ताजेतवाने राहते.
साबुदाण्याची खीर
उपवास सोडल्यानंतर तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता. साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि लोह असते, जे शरीराला उर्जा प्रदान करते. ही खीर पचायला हलकी आणि चवीलाही उत्तम असते. त्यामुळे उपवास संपल्यानंतर शरीराला उर्जेची गरज भासल्यास साबुदाण्याची खीर उत्तम पर्याय ठरतो.
मखाना खीर किंवा शेक
मखाना हा आरोग्यासाठी लाभदायक पदार्थ असून तो विविध प्रकारे सेवन करता येतो. मखान्यात प्रथिने, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील थकवा दूर करतात. तुम्ही मखाना खीर, मखाना शेक किंवा केवळ भाजलेले मखानेही खाऊ शकता.
४. राजगिरा पीठाची पुरी
राजगिरा पीठ हे उपवासासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असतात, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. शिवाय, राजगिरा खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
सुकामेवा आणि ड्रायफ्रुट्स
महाशिवरात्रीचा उपवास सोडताना तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके हे उपवास संपल्यानंतर शरीराला आवश्यक पोषण देतात. तसेच तुम्ही ड्रायफ्रुट्स घालून खीर, शेक किंवा लाडू देखील खाऊ शकता.
उपवास सोडताना घ्यावयाची काळजी
- उपवासानंतर अतिशय जड किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा.
- शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
- लिंबूपाणी, ताक किंवा नारळपाणी यासारखे द्रव पदार्थ घेतल्याने शरीराला पोषण मिळते.
- हलका आणि पौष्टिक आहार घेऊन उपवास सोडल्यास शरीरावर कोणताही ताण पडत नाही.
महाशिवरात्रीचा उपवास हा भक्तीभावाने पाळला जातो. मात्र, उपवास सोडताना योग्य आहार घेणे तितकेच गरजेचे आहे. फळे, साबुदाणा, मखाना, राजगिरा आणि सुकामेवा यांसारखे पौष्टिक पदार्थ घेतल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि उपवासाचा सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतो.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. तरुण भारत लाईव्ह, अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.