जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर काय स्वस्त, काय महाग; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलची ५० वी बैठक रात्री उशिरा संपली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे काही सेवा आणि वस्तूंवर जीएसटी वाढवण्याचा किंवा लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

जीएसटी कौन्सिलनं ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ऑनलाइन गेमिंग, कसिनो, हॉर्स रेसिंग महाग होतील. मल्टी युटिलिटी आणि क्रॉसओव्हर युटिलिटी श्रेणीतील वाहनांवर २२ टक्के उपकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर अनेक वाहने महागणार आहेत.

जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर सिनेमागृहातील खाण्यापिण्याचे पदार्थ स्वस्त होणार आहेत. आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर आयजीएसटी न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलनं खासगी ऑपरेटर्सच्या जीएसटी उपग्रह प्रक्षेपण सेवेला सूट दिली आहे. यामुळे सॅटलाईट सर्व्हिस लाँच स्वस्त होणार आहेत. कच्च्या आणि न तळलेल्या स्नॅक पॅलेट्सवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आलाय. फिश पेस्टवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. तर कृत्रिम जरीच्या धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के आणि एलडी स्लॅगवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आलाय.