मुक्ताईनगर : कोथळी (ता. मुक्ताईनग ) येथे यात्रेत आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा संतप्त प्रकार रविवारी (२ मार्च) उघडकीस आला. या मुलींची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेसंदर्भात म्हणाले, दुर्दैवाने छेडछाडीच्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे लोक आहेत. ज्यांनी अतिशय वाईट कृत्य केले आहे. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. इतरांनाही अटक केली जाईल. असे छेडछाडीचे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. असा त्रास मुळीच सहन केला जाणार नाही. असे वर्तन करणाऱ्या लोकांना माफी देता कामा नये आणि हीच शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोथळी येथे मंत्री रक्षा खडसे यांची कन्या तिच्या मैत्रिणींसह यात्रेत गेली होती. सोबत सुरक्षा रक्षक होता. काही टवाळखोरांनी छेड काढण्याचा प्रयत्न केला असता या संशयितांनी सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालत त्याच्याशी अरेरावी केली होती. या प्रकरणी तक्रार दिली आहे.
रविवारी छेड प्रकरणी स्वतः पीडित मुलीने तक्रार दिली. ना. रक्षा खडसे पोलीस ठाण्यात त्यांच्या कन्येसह दाखल झाल्या होत्या. त्यानंतर या घटनेचे जिल्ह्यासह राज्यात तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, या मुलींची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.