WhatsApp : दोनशे कोटीहून अधिक वापर होणाऱ्या या मेसेजिंग एप्लिकेशन चा आज आहे वाढदिवस

WhatsApp : जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग एप्लिकेशन व्हाट्सअपचा आज वाढदिवस आहे.

 

२४ फेब्रुवारी २००९ रोजी जेन कॉम याने व्हाट्सअप inc नावाची कंपनी स्थापन केली. व्हाटसअपचा निर्माता जेन कॉम याचा जन्म युक्रेन देशातील छोट्या गावात झाला. त्याचे वडील मजूर तर आई गृहिणी होती. युक्रेनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे वडील अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे ते छोटीमोठी कामे करू लागले. जेन कॉम याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची आवड होती. त्याच्या घराजवळच एक लायब्ररी होती. तेथून तो कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे पुस्तके आणत व घरच्या कॉम्प्युटरवर प्रोग्रामिंग करीत. पुढे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री मिळवून एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम सुरू केले.

 

१९९७ साली याहू कंपनीने  इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर या पदावर त्याची नेमणूक केली. या कंपनीत त्याने ९ वर्ष नोकरी केली. दुसऱ्या कंपनीत  नोकरी करण्यापेक्षा स्वतःची कंपनी सुरू करावी या विचाराने त्याने याहूला राजीनामा दिला. याहूमध्ये ब्रायन अकटन हा त्याचा सहकारी होता. त्यानेही याहूला राजीनामा दिला. दोघांनी मिळून स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे ठरवले. त्या सुमारास ऍप्पल कंपनीने आयफोन बाजारात आणला होता. त्यात मेसेज पाठवण्याची सुविधा होती. त्यावरून त्यांना व्हाटसअपची कल्पना सुचली.

 

पुढे दोघांनी  त्यावर काम करण्यास सुरवात केली त्यात त्यांना यश मिळाल्याने २४ फेब्रुवारी २००९ रोजी त्यांनी व्हाटसअप inc नावाची कंपनी स्थापन केली. सुरवातीला व्हाट्सअप ला खूपच कमी प्रतिसाद मिळाला कारण तेंव्हा अँड्रॉइड मोबाईलची संख्या खूप कमी होती पण जशी  अँड्रॉइड मोबाईलची संख्या वाढत गेली तशी व्हाटसअप वापरणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. आज व्हाटसअप जगातील पहिल्या क्रमांकाचे एप्लिकेशन बनले आहे.

 

जगातील किमान दोनशे कोटीहून अधिक लोक व्हाटसअपचा वापर करतात. प्रत्येकाच्या  मोबाईलमध्ये व्हाटसअप असतेच. व्हाटसअपवर रोज ७५००० कोटीहून  मेसेज सेंड होतात. व्हाटसअप वरुन दररोज २५० कोटी फोटो तसेच ५० कोटी व्हिडीओ शेअर होतात. सुरवातीला फक्त इंग्रजीमध्ये असणारे व्हाटसअप आज ५३ भाषांमध्ये आहे.

 

व्हाटसअप नेहमीच नवनवीन सुविधा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन देते. व्हिडिओ कॉल, ऑडियो कॉल, स्टेटस अशा नवनवीन सुविधा व्हॉट्सअप कडून वापरकर्त्यांना  देण्यात आल्या आहेत. आज व्हाटसअप वरून पैसेही पाठवता येऊ शकतात.  २०१४ साली फेसबूकच्या मार्क झुकेरबर्ग याने १९ बिलियन डॉलरला जेन कॉम आणि ब्रायन अकटन यांच्याकडून व्हाटसअप खरेदी केले.

 

आज व्हाटसअपची मालकी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे आहे. आज व्हाटसअप प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.  व्हाटसअपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

श्याम ठाणेदार ,दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५