तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. याचसोबत बहुतांश मोठ्या राज्यांचे बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे.
बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन, शिक्षक संघटनांचा संप, प्रश्नपत्रिकेचा घोळ, पेपरफुटी, यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. असे असले तरी दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे
यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून बारावीच्या परीक्षेला 15 लाख 5 हजार 27विद्यार्थी बसले आहेत. राज्यातील जवळपास 3195 परीक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. तर दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. आता या परिक्षेचा निकाल कधी लागतो याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे.