Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने “भूतो न भविष्यती” अशी कामगिरी करून दाखवली. महायुतीचे वारू उधळले. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. महाविकास आघाडीचा 50 जागांच्या आत खेळ आटोपला. तर महायुतीने 230 हून अधिकचा मॅजिक फिगर गाठला. त्यात भाजपाला 132 जागांवर यश आले. भाजपा मोठा भाऊ ठरला. त्यानंतर शिंदे सेनेला 57, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असतील हे निश्चित झाले आहे. मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यातच आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा चालली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १२ वाजता संपली. या बैठकीला शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.
या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार ? यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर ?
येत्या २ तारखेपर्यंत कोणताही चांगला मुहूर्त नाही. २ तारखेनंतर जेव्हा चांगला मुहूर्त असेल तेव्हा सरकार स्थापन होईल. २ डिसेंबरनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोक या शपथविधीसाठी उपस्थितीत राहू शकतात. त्यांच्या सुविधेप्रमाणे सगळं ठरविला जाईल, असे दीपक केसरकर म्हणाले.