मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार ? अजित पवारांनी सांगितली तारीख

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत गुरुवारी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत महत्वाची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत मुख्यमंत्री कोण असेल ? यावर शिक्कामोर्तबही होईल. तसंच मंत्रिमंडळाचा पॅटर्न कसा असेल ? आणि इतर कुठल्या महत्वाच्या बाबींवर चर्चा होणार आहे, याची माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगर इथं बोलताना दिली.

ते म्हणाले की, उद्या आम्ही तिघेही जण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर तिथं आमची बाकीची सर्व चर्चा होईल. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि दोन मुख्यंमत्री असं सरकार अस्तित्वात येईल. पण लगेचच नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे. पुरवणी मागण्या मंजूर करुन घ्याव्या लागतील. असं फार कामाचं लगेचच प्रेशर राहणार आहे. पण आम्ही बहुतेकजण अनुभवी असल्यानं त्यात काही अडचणी येतील असं वाटत नाही.  28 तारीख आहे. 30 किंवा 1 डिसेंबरपर्यंत शपथविधी सोहळा व्हावा, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांना काहीही वाटत असले तरी शेवटी किती लोक निवडून आले, किती लोक निवडून आले हेही पाहिले जाते. गेल्या अडीच वर्षांची गोष्ट वेगळी आहे. आताची गोष्ट वेगळी आहे, असे अजित पवार म्हणाले.