नवी दिल्ली : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. कर्तव्यपथावरील परेडसह शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यात असून, सर्वत्र देशभक्तीच्या जयघोषाने वातावरण भारावले आहे. या पार्श्वभूमीवर आज भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कुठे आणि कसा साजरा झाला ? याबद्दल जाणून घेऊया…
पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा
पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळा कर्तव्यपथावर नव्हे, तर आयर्विन स्टेडियम हे या ऐतिहासिक दिवसाचे पहिले साक्षीदार ठरले. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि देश प्रजासत्ताक बनला. यानिमित्त देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीतील आयर्विन स्टेडियम (आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम) येथे तिरंगा फडकावला. यावेळी 30 तोफांची सलामी देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करून भारताच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचा सन्मान
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याने भारताच्या जागतिक मैत्रीचे प्रतीक अधोरेखित केले.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा प्रवास
भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन आयर्विन स्टेडियमवर साजरा झाला, पण नंतर लाल किल्ला, किंग्ज वे कॅम्प आणि रामलीला मैदान यांसारख्या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 1955 मध्ये पहिल्यांदा राजपथाची निवड परेडसाठी करण्यात आली.
कर्तव्यपथावरील परेडची परंपरा
कर्तव्यपथावरील परेड ही प्रजासत्ताक दिनाची शान समजली जाते. रायसीना हिल येथील राष्ट्रपती भवनापासून सुरू होणारी परेड इंडिया गेटमार्गे लाल किल्ल्यावर संपते. जवळपास 5 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर भारताची सशस्त्र दलांची ताकद, सांस्कृतिक विविधता आणि प्रगतीचे दर्शन घडते.
तोफांच्या सलामीचा बदल
पहिल्या प्रजासत्ताक दिनी 30 तोफांची सलामी देण्यात आली होती, मात्र नंतर यामध्ये बदल करून ती 21 तोफांची करण्यात आली. ही सलामी देण्यासाठी 1941 मध्ये बनवलेल्या खास ‘पॉन्डर्स’ तोफांचा उपयोग केला जातो.
प्रजासत्ताक दिनाचे महत्व
प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचा उत्सव आहे. हा दिवस केवळ राष्ट्रीय परंपरेचे प्रतीक नसून, देशाच्या प्रगतीचा अभिमान आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडवतो. आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. कर्तव्यपथावरील परेडसह शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यात असून, सर्वत्र देशभक्तीच्या जयघोषाने वातावरण भारावले आहे.