बंगळुरु : बंगळुरूमध्ये आज विरोधकांच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे बंगळुरूमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान विरोधकांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारावरुन राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत विरोधकांना एकजूट होण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आता विरोधकांमध्ये ऐकी नसल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत.
देशातील सर्वात मोठे विरोधी नेते बंगळुरूमध्ये एकत्र आले आहेत. बैठकीचा आज महत्त्वाचा आणि दुसरा दिवस आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच विरोधी एकजुटीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र पोस्टर्समध्ये त्यांना अस्थिर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून संबोधले गेले आहे. बंगळुरूमध्ये अशी अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
विरोधी एकजुटीच्या पोस्टर्समध्ये नितीश कुमार यांच्यावर टीका करणारे पोस्टर लावणाऱ्यांचा शोध सुरू झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मोठमोठे पोस्टर्स रातोरात कसे लावले गेले, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या पोलिसांनी अशी सर्व पोस्टर्स पहाटेच हटवली आहेत. इतर ठिकाणीही असे पोस्टर्स लावू नयेत, असे चित्र आहे.