Mahavikas Aaghadi CM । विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली. दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवार तर सोडा पण जागा कुठल्या पक्षासाठी सुटेल याबाबतचाही तिढा कायम आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार ? यावरून महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू असल्याचे बोलले जात आहे. यात मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागून आहे.
विधानसभेची ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रत्येष्ठीची मानली जात आहे. अशातच दोन्ही गटाने निवडणुकीच्या या मैदानात कंबर कसली आहे. यात महायुतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचा जागेचा तिढाही कायम आहे. जागा वाटपावरही एकमत होत नसताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ? याबाबतही शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे.
दरम्यान , महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती उद्धव ठाकरे यांनी आधीच दोनदा केली आहे. परंतु, इतर दोन पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे विधान केले आहे. शिवाय काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा आहे ते सांगावे असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार ? यावरून महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू असल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचीच री पुन्हा एकदा ओढली. 2019 मध्येही मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे संजय राऊत म्हणाले.
जर काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा कुठला चेहरा असेल तर त्यांनी सांगावे, असे आवाहन राऊत यांनी दिला. नाना पटोल माझे मित्र आहेत. महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे ते मी सांगतोय, असं सांगत राऊत यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले आहे. असं सांगत मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल असे नाना पटोले म्हणाले.
शिवाय मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. निवडणुकीला आम्ही आघाडी म्हणूनच सामोरे जाणार आहोत. जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊत यांना चिमटे काढले आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे.
त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात याला काही अर्थ नाही. ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यावेळी त्यावर निर्णय होईल. काँग्रेसकडे चेहरे पण आहेत आणि ताकद ही आहे. ही वस्तूस्थिती राऊतांनी स्विकारली पाहीजे असे थोरात म्हणाले. एकंदरीत या तिन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली रस्सीखेच पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीत अंतर्गत कुरघोड्या झाल्या नाही तर नवलच.