देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण? असा आहे सर्व्हे

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीनंतर भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालीय का? असा प्रश्‍न उपस्थित होत असतांना लोकनीती-सीएसडीएस आणि एनडीटीव्हीचा एक सर्व्हे समोर आला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यातील लोकप्रिय नेता कोण? या प्रश्‍नाचे उत्तर समोर आले आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर १९ राज्यात १० मे ते १९ मे या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधानपदासाठीही लोकांची पहिली पसंती नरेंद्र मोदी आहेत. सर्व्हेत सहभागी ४३ टक्के लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएला तिसर्‍यांदा सत्ता मिळायला हवी असं तर ३८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले आहे.

जर आज निवडणुका लागल्या तर ४० टक्के जनतेने भाजपाला मतदान देणार असल्याचे म्हटलं. तर २९ टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दर्शवली. २०१९ मध्ये भाजपाची मतदान टक्केवारी ३७ टक्के होती ती २०२३ मध्ये ३९ टक्के झाली आहे. परंतु काँग्रेसच्या मतदान टक्केवारीत १९ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे आज निवडणुका लागल्या तर पंतप्रधानपदासाठी ४३ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पहिली पसंती दिली आहे. त्यानंतर दुसर्‍या नंबरवर राहुल गांधी आहेत. २७ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांना अनुक्रमे ४ टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे. अखिलेश यादव ३ टक्के तर नितीश कुमारांना १ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणार्‍यांपैकी बहुतांश त्यांच्या भाषणाचे चाहते आहेत. विकासासाठी २० टक्के, हार्ड वर्कसाठी १३ टक्के, मोदींची लाट १३ टक्के आणि ११ टक्के मोदी सरकारच्या धोरणांना लोकांची पसंती आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर कोण देईल? हे लोकांना विचारले असता त्यानुसार ३४ टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले तर ११ टक्के अरविंद केजरीवाल, ५ टक्के अखिलेश यादव आणि ४ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींची नाव घेतले.