Assembly Election 2024 । अमळनेर विधानसभेत कुणाची लागणार वर्णी ?


दिनेश पालवे
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत सहा वेळा काँग्रेस, तीन वेळा भाजप आणि दोनदा जनता पक्ष तर जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एक वेळेस प्रतिनिधित्व केले आहे तर दोन वेळेस अपक्षांनी मतदार संघात प्रतिनिधित्व केले आहे.

विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात जाऊन मंत्रीपद खेचून आणले, त्याजोरावर अमळनेर तालुक्यासह शहरात बरेच विकासकामे झाली. त्यात तालुकावासीयांचा जिव्हाळ्याचा पाडळसे प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट व्हावा यासाठी केलेले प्रयत्न व दिलेला भरीव निधी तर आय.टी.आयला संत सखाराम महाराज यांचे दिलेले नाव.

लाडली बहीण योजनेचा होणार फायदा
लाडली बहीण योजनेचा अधिक फायदा होईल. त्यासोबतच जयश्री अनिल पाटील यांचा थेट जनतेशी संपर्क जमेची बाजू ठरणार आहे. विद्यमान मंत्री अनिल पाटील यांच्याप्रमाणे काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांनी मागच्या पाच वर्षांपासून आपल्या कामाची सुरुवात केली आहे.

शरद पवार गटाच्या अॅड. तिलोत्तमा पाटील या एकनिष्ठ म्हणून उमेदवारी मिळवतील तर उबाठा सेनेच्या अॅड. ललिता पाटील या त्यांच्या अनोख्या शैलीने उमेदवारी मिळवतील व सर्वांना आश्चर्याचा धक्का देतील तर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना मागच्या निवडणुकीची सहानुभूती मिळते का ? ते पुन्हा विधानसभेवर जातात का ? हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

एवढे आहेत मतदार
अमळनेर विधानसभा मतदारसंघात १ लाख ५६ हजार ९८० पुरुष मतदार आहेत, तर १ लाख ४९ हजार ३८७ स्त्री मतदार आहेत. तसेच इतर ३ असे एकूण ३ लाख ६ हजार ३७० मतदार आहेत. अमळनेर शहरात ८३, ग्रामीण भागात १९० तर पारोळा ग्रामीण भागात ५२ असे एकूण ३२५ म तदान केंद्र आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेले ३ हजार ८८७ तर शारीरिकदृष्ट्या दुर्बल असे एकूण २ हजार ३१८ मतदार आहेत.

उमेदवारावर ठरणार विजयाचे गणित
कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा कामापुरता जनतेशी संपर्क असल्याने व मागच्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेला दिलेले शब्द न पाळल्याने नाराजी वाढली आहे. याचा परिणाम ते ज्यांना पाठींबा देतील त्या उमेदवाराचे नुकसान करणारा असणार आहे. उमेदवार कसे ठरतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे. यातील एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते खासदार स्मिता वाघ यांच्यावर नाराज असून त्याचा परिणाम कुणाला भोगवा लागतो हे देखील निवडणुकीनंतर समजणार आहे.