ICC Champions Trophy 2025 : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या सामन्यावर आहे. भारताच्या क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना म्हणजे उत्सवच! मात्र, या सामन्याआधी एक भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरली आहे.
भारत-पाकिस्तानच्या या महामुकाबल्यापूर्वी आयआयटी बाबा अभय सिंह यांनी मोठा दावा केला आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सामन्यात पाकिस्तान विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला. “विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनी कितीही मेहनत घेतली तरी विजय त्यांच्या हातून निसटेल,” असे त्यांचे वक्तव्य होते.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
या भविष्यवाणीनंतर सोशल मीडियावर आयआयटी बाबा ट्रोल होत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची सुरुवात खराब झाली आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने त्यांना 60 धावांनी पराभूत केले. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात घरच्या मैदानावरही पाकिस्तानला नामुष्कीला सामोरे जावे लागले.
भारताविरुद्ध पाकिस्तानची स्थिती करो या मरो अशी झाली आहे. मात्र, आयआयटी बाबांच्या भविष्यवाणीनंतर काही भारतीय चाहते चिंतेत पडले असले तरी बहुतांश चाहत्यांचा विश्वास आपल्या संघावर आहे. “आयआयटी बाबांची भविष्यवाणी झूठ ठरेल आणि टीम इंडिया पाकिस्तानला धोबीपछाड देईल,” अशा अनेक भावना सोशल मीडियावर उमटत आहेत.
आता 23 फेब्रुवारीला नेमके काय होते, आयआयटी बाबांची भविष्यवाणी खरी ठरते की भारत पाकिस्तानला धूळ चारतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.