मुंबई | विधीमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला. यावर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा – त्याचा प्रश्न असतो. परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी सभागृहात केली.
विधानभवनाच्या पायर्यांवर सत्ताधारी आमदार आज एक बॅनर घेऊन बसले होते. त्यावर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा फोटो होता. त्या फोटोला जोडे सत्ताधारी आमदार विधीमंडळाच्या कार्यक्षेत्रात मारत होते. हे विधीमंडळ अध्यक्ष व सभापती यांच्या अखत्यारीत येते. आज काँग्रेस नेत्यांबद्दल अशाप्रकारची गोष्ट सत्ताधारी आमदारांकडून घडली आहे. उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल.
प्रत्येक पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात. तुमच्या पक्षांचा नेत्यांचा अभिमान आहे तसा आम्हालाही आमच्या नेत्यांचा अभिमान आहे. अशी जोडे मारण्याची पध्दत विधीमंडळ आवारात सुरू झाली तसे दुसर्या कुणाच्या तरी फोटोला जोडे मारले तर कुणालाच आवडणार नाही आणि आम्हालाही ते पटणार नाही, असेही अजित पवार यांनी सरकारला सुनावले.
अशाप्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधीमंडळाच्या परिसरात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून तातडीने विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी पावले उचलली पाहिजे असे सांगतानाच जोडे मारण्याच्या घटनेचा तीव्र निषेध अजित पवार यांनी यावेळी केला.