कोल्हापूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि प्राप्तीकर खात्याकडून धाड टाकण्यात आली. हसन मुश्रीफ यांचे घर, कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरी झाडाझडती घेतली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर ही कारवाई होण्यापाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षभरापासून ईडीकडे केलेला पाठपुरावा महत्त्वाचा मानला जात आहे. या धाडीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
हसन मुश्रीफांवर कोणत्या प्रकरणात कारवाई?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटंबीयांनी बनावट कंपन्या तयार करुन १५८ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. विविध कंपन्यांच्या माध्यमातून मुश्रीफ कुटुंबीयांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम वळती करण्यात आली. यामध्ये मुख्यत्त्वेकरुन मुश्रीफ यांचा मुलगा आणि जावयाचा समावेश असल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्यानुसार, २०२० मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला.
या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. केंद्राकडून मिळणारा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. या निधीमध्ये मुश्रीफ यांनी जावयासोबत पंधराशे कोटींचा घोटाळा केला आहे. कंपनी अस्तित्वात नसताना या कंपनीला ठेका देण्यात आला. जावई मतीन मंगोली यांच्या बेनामी कंपनीला दादागिरीने ठेका दिला. बेनामी, बंद असलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी घोटाळे केले आहेत. यश, अष्टविनायक, ब्रिक्स इंडिया आणि इतर काही कंपन्यांचा यासाठी वापर केला आहे.