होळी का साजरी केली जाते? जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह ।०६ मार्च २०२३। संपूर्ण भारतभर तसेच इतर काही देशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक सण म्हणजेच होळी. होळी हा वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्वपूर्ण सण आहे. यावेळी रंगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. होळी हा सण रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो. प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण, त्या सणाचा इतिहास असतोच. होळी हा सण साजरा करण्यामागे असेच एक कारण सांगितले जाते.

प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूपच श्रेष्ठ समजत असे. देवीदेवतांविषयी त्याला खूपच घृणा, तिरस्कार होता. त्याच्या समोर कोणी देवाचे नाव जरी उच्चारले तरी त्याला हिरण्यकश्यपू भयानक शिक्षा देत असे. पुढे हिरण्यकश्यपूला एक पुत्र झाला, त्याचे नाव प्रल्हाद. मात्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र भगवान विष्णूच्या नामाचे स्मरण करत असे.

हि गोष्ट हिरण्यकश्यपूला अजिबात पचनी पडली नाही. त्याने प्रल्हादाची भगवान विष्णूच्या नामस्मरणाची सवय सुटावी यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र प्रत्येकवेळी हिरण्यकश्यपूला त्यामध्ये अपयश आले. शेवटी वैतागून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा वध करण्याची योजना आखली.

हिरण्यकश्यपूची बहिण जिचे नाव होलिका होते, या होलीकेला अग्नीने न जळण्याचा आशीर्वाद मिळाला होता. हिरण्यकश्यपूने होलिकेला फर्मान सोडले कि तिने प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसावे. जेणेकरून जळत्या अग्निचीतेवर प्रल्हादही भस्मसात होईल. त्याप्रमाणे होलिका अग्नीच्या चितेवर बसली. कारण तिला अग्नीने न जळण्याचा आशीर्वाद मिळाला होता. प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाला. मात्र आता प्रल्हादाऐवजी होलीकाच जळायला सुरुवात झाली.

भक्त प्रल्हादाला या अग्नीने कोणतीही इजा झाली नाही. मात्र होलिका या अग्निचीतेवर जळून भस्म झाली. भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाचे अग्नीपासून संरक्षण केले होते. त्यादिवशी लोकांनी खूप मोठा आनंद साजरा केला. त्यादिवसापासूनच होळी हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

पहा व्हिडिओ
https://youtu.be/4qX8cIf5yKc