जळगाव : एप्रिल आणि मे महिना म्हटला की रखरखतं उनं आणि त्यामुळे अंगाची होणारी लाहीलाही…असे काहिसे चित्र राज्यभरात कमी अधिक प्रमाणात दिसते. मात्र यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने कहर केला. मे महिना उजाडला तरी अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाहिए. उन्हाळ्यात पहिल्यांदाच अवकाळी पाऊस होतोय, असं नाही. याआधीही भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र यंदाची परिस्थिती वेगळीच आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. गत १५ दिवसांपासून अवकाळी पाऊस राज्यात अनेक ठिकाणी ठाणं मांडून असल्याने शेती व शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सोसाट्याचा वारा, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे संपूर्ण राज्यात कहर केला आहे. याचं कारण म्हणजे, हवामानातील बदल.
भारतीय द्वीपकल्पाच्या दोन बाजूंना अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे वाहत असतात. या वाहणार्या वार्यांची दिशा वेगवेगळी असते. समुद्राकडून येणार्या वार्यांमध्ये बाष्प असते. हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड आणि कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. हे दोन्ही वारे एकमेकांशी भिडण्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय.
हवामान तज्ञांच्या मते, हवा जास्त उंचीपर्यंत गेल्यास आणि दुसरी या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त झाल्यास गारपीट होण्याची शक्यता वाढते. बाष्पाचे प्रमाण वाढण्यासाठी बंगालच्या उपसागरावरुन तर कधीकधी अरबी समुद्रावरुन येणारे वारे कारणीभूत ठरतात, कारण येताना ते सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास आणि नंतर दक्षिणेकडे सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे ते वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.