ट्रक चालक का उतरलेय रस्त्यावर ? नवी मुंबईत हिंसक वळण; बांबू घेऊन आंदोलक पोलिसांच्या मागे

नवी मुंबईः केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहनचालकांचं आंदोलन सुरु आहे.

नवी मुंबईत देखील ट्रक चालकांनी आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबईतल्या जेएनपीटी मार्गावर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ट्रक आणि डंपर चालकांनी रस्त्यावर वाहनं उभी केल्याने पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काहीजण बांबू घेऊन पोलिसांच्या मागे लागले. यावेळी पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय आहे तरतूद
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित केला आहे. यानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.