राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची चर्चा का होतेय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचा केलेला दावा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याच दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मुखपत्रात रविवारी एक लेख लिहून काही संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन दिवसांपूर्वीच्या भेटीचा संदर्भ देण्यात आला आहे.

राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मुखपत्रात रविवारी असे लिहिले की, उद्धव ठाकरेंसोबत मी शरद पवार यांना भेटलो. तेव्हा पवार हे ठाकरेंना म्हणाले की, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही. पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण पक्ष म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही. या बैठकीत पवार-ठाकरे यांचे असे मत पडले की जे भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील.

पवार असेही म्हणाले की, जे भीतीने आज पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही भाजपत गेल्याने टेबलावरची फाइल कपाटात जाईल पण ईडी, सीबीआयच्या फायली कधीही बंद होत नाहीत. पवार-ठाकरे यांच्या या बैठकीतील माहिती खा. राऊत यांनी उघड केल्यानंतर भाजपमध्ये जाण्यासाठी पवार यांच्या कुटुंबातील कोणावर दबाव आहे, अजित पवार भाजपसोबत जाणार का, या चर्चांना उधाण आले.