मुंबई : राज्यातील रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेना (शिंदे गट) विरोध करत आहे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना देण्यात आले. मात्र, या निर्णयावर शिवसेना (शिंदे गट) नेते भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शने केली. महाड विधानसभा संघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले.
हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये दादा भुसे समर्थकांचा विरोध
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने दादा भुसे समर्थक नाराज आहेत. दादा भुसे हे पुन्हा नाशिकचे पालकमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे राज्य सरकारने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.