जळगावात पतीकडून पत्नीला बेदम मारहाण; प्रकरण पोहचलं पोलिसांत

जळगाव : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला टाके पडले असून उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अयोध्या नगरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, गुरूवार ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कौटूंबिक वादातून पतीने पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी रॉड विवाहितेच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच मारहाणीत विवाहितेचा हात देखील फ्रॅक्चर झाला आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विवाहितेने दिलेल्या जबाबावरुन शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संशयित पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.