नागपूर : पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली असून, आरोपी प्रियकर फरार आहे.
नरेंद्र (वय ४१, रा. गोधनी रेल्वे) असे मृतकाचे नाव असून अटकेत असलेल्या आरोपी पत्नीचे नाव दुर्गेश्वरी (वय ३५) आणि फरार आरोपी प्रियकराचे नाव राहुल मनोहर (वय ४५) असे आहे.
हेही वाचा : तर टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून होऊ शकते बाहेर, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश्वरी व राहुल यांच्यात अनैतिक संबंध होते. याबाबत पती नरेंद्र यांना माहिती मिळाल्यानंतर घरात नेहमी वाद होत होते. दुर्गेश्वरी आणि राहुल दोघांनीही नरेंद्र यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्यावर मानसिक तसेच शारीरिक छळ केला. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली जात होती. सततच्या यातनांमुळे नरेंद्र हे तणावात राहत होते.
१७ फेब्रुवारी रोजी सकाळी नरेंद्र यांनी राहत्या घरी लोखंडी हुकला दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिस तपासात दुर्गेश्वरी आणि राहुल यांच्या सततच्या छळामुळे नरेंद्र यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दुर्गेश्वरीला अटक केली, तर राहुल फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्या पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.