---Advertisement---
जळगाव : शहरातील रामानंद नगर पोलिस ठाणे परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यावेळी पोलीस कर्मचारी योगेश माळी यांनी स्वतःचा शर्ट काढून तरुणाला विझविले. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रानुसार, सुनील ममराज वाघ (२४, रा. समतानगर) असे या तरुणाने नाव आहे. पती-पत्नीतील आपसातील वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या सुनील वाघ या तरुणाने पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.
समतानगरमधील सुनील वाघ व त्याच्या पत्नीत आपसात वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे हा तरुण त्याच्या मामीसह रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला.
तो बाहेर उभा असताना त्याची मामी पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तरुणाला त्याच्या पत्नीचा कॉल आला. तो तिला घरी परत येण्यासाठी सांगू लागला. त्यांच्यात शाब्दीक वाद वाढत गेला व त्याने दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर टाकून पेटवून घेतले.
त्याच्या चेहऱ्यावर आगीची झळ लागून त्याला इजा झाली. तरुण भाजला गेल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली.









