पुणे : सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाखाली आढळलेल्या मृतदेहाचे गुढ अखेर उलगडले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच खून केला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासात दोघांना बेड्या घातल्या आहेत.
सारोळा येथील नीरा नदीच्या पुलाखाली रविवारी ( दि. ९ ) सकाळी एक मृतदेह पोत्यात बांधलेल्या स्थितीत आढळून आला. मात्र, पोलिसांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे अवघड झाले होते.
दरम्यान, मृतदेहाच्या उजव्या हातावर ‘ओम’ असा टॅटू आढळल्याने पोलिसांनी खबरी कामाला लावले. हातावर ‘ओम’ गोंदलेली एक व्यक्ती अनेक दिवस बेपत्ता असल्याचे नोंद एका पोलिस ठाण्यात सापडली आणि पोलिसांना अखेर क्लू मिळाला.
हेही वाचा : पतीचे अनैतिक संबंध; २५ वर्षीय विवाहितेने संपविले जीवन, चाळीसगावातील घटना
चौकशीत ससाणेनगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समोर आले. या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर भिसे ( ३५ ) असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी सिद्धेश्वर यांच्या पत्नीची चौकशी सुरू केली असता तिने खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धेश्वर यांची पत्नी योगिता भिसे (३०) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार ( 32 ) दोघांना अटक केलीय.
योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी याचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही शिवाजी तिला भेटण्यासाठी गावावरून येत होता. मात्र, या प्रेमसंबंधात सिद्धेश्वर अडचण ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह नीरा नदीच्या पुलाखाली फेकून दिला.