जळगाव : जिल्हयात महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीय. नुकतीच धरणगावच्या हनुमंतखेडा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने धारधार शास्त्राने वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली होती. आता अशीच एक घटना रावेरच्या आभोडा गावात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. आशा संतोष तायडे (वय 38) असे खून झालेल्या विवाहितेचे तर संतोष शामराव तायडे असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.
रावेर तालुक्यातील आभोडा गावात तायडे दाम्पत्य वास्तव्याला होते. शेती व मजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. पती संतोषला पत्नी आशाच्या चारित्र्यावर संशय होता तसेच पत्नी आशाकडे असलेले पैसे कुणाला दिले हे सांगण्यासाठी ती टाळाटळ करीत असे. या रागातून आरोपी पतीने सोमवारी पहाटे 3.30 ते चार वाजेच्या सुमारास दोन्ही हाताने गळा दाबून पत्नी आशची हत्या केली. त्यानंतर आरोपी पतीने रावेर पोलीस ठाणे गाठत पत्नीच्या हत्येची माहिती दिली.
हेही वाचा : लव्ह मॅरेज करूनही परपुरुषाशी संबंध, रंगेहात पकडणाऱ्या पतीला तुकडे करून ड्रमध्ये भरण्याची धमकी
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, उपनिरीक्षक दीपाली पाटील, पोलीस हेड कॉस्टेबल ईश्वर चव्हाण, कॉस्टेबल कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, संदीप पाटील, अतुल गाडीलोहार यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भेट देऊन पोलिसांना तपास कामाबाबत निर्देश दिले.
याबाबत पोलीस पाटील राजू नुरखा तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या खरेदीवरून आरोपी संतोष तायडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.