रानडुकरांनी उद्वस्त केला सात एकर शेतातील मका; नुकसान भरपाईची मागणी

एरंडोल : तालुक्यातील उमरदे शिवारातील गट नंबर १९७/२ क्षेत्र सात एकर शेतात पेरणी केलेल्या मक्याचे पीक वन्यप्राणी रानडुकरांनी रात्री शेतात येऊन उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

येथील प्रगतिशील शेतकरी तथा माजी उपनगराध्यक्ष संजय खंडू महाजन व मालती सुभाष महाजन यांचे पद्मालय शिवारातील उमरदे येथे शेती आहे. संजय महाजन व मालती महाजन यांनी सात एकर क्षेत्रात मक्याची पेरणी केली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रानडुकरांनी संजय महाजन यांच्या शेतातील पेरणी केलेले मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संजय महाजन यांनी रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.

याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संजय महाजन व मालती महाजन यांनी केली आहे. दरम्यान, पद्मालय शिवारात यापूर्वी देखील वन्यप्राण्यांनी अनेक शेतकऱ्यांच्य शेतातील पिकांचे नुकसान केले असल्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जंगलात रानडुकरांची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पद्मालय शिवारात घनदाट जंगल असल्यामुळे रानडुकरांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी
पद्मालय वनक्षेत्राला लागून असलेल्या मालतीबाई महाजन सुभाष खंडू महाजन यांच्या शेतात नुकताच पेरलेल्या मका पिकाचे रान डुकरे व इतर वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे सदर पीक फक्त पंधरा दिवसाचे होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून त्यानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात आले वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जवळपास एक वर्षांपूर्वी वनखात्यामार्फत विखरण शिवारातील काही शेतकऱ्यांना तार कंपाऊंड व झटका मशीन देण्यात आले होते मात्र आम्हाला सदर साहित्य मिळाले नाही तरी आम्हाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले

संजय महाजन व मालतीबाई महाजन यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा केला असून योग्य ती पाहणी करून लवकरच नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल या महिन्यात वीस ते बावीस शेती पिकाचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. 
–  शिवाजी माळी, वनरक्षक, पद्मालय वन परिक्षेत्र.

.