मोलगी : सातपुड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेकडो प्रकारच्या पावसाळी वनौषधी रोपांची उगवण झाली आहे. अल्पजीवी असलेल्या या वनौषधींमध्ये रानकेळी हे जंगली केळीचे खोड सध्या नागरिकांसाठी आकर्षक ठरत असून त्याची खरेदी करण्यासाठी अनेक जण सातपुड्यात हजेरी लावत आहेत. शरीरातील जीवनसत्त्वे आणि इतर लोहयुक्त घटकांची कमी भरून काढणा-या खोडाला मोठी मागणी असते.
प्रामुख्याने आदिवासी बोलीभाषेत नाथडो अशी रानकेळीची ओळख आहे. गवतवर्गीय रानकेळीचे खोड जंगलात उगवते. केळीच्या खोडासारखेच हे खोड केवळ पावसाळ्यात उगवणा-या या खोडाला खाल्ल्याने पोटदुखीचच्या आजारांसह किडनी आणि मूतखड्याचे आजार बरे होतात.
मीठ टाकून खाल्ल्याने याची चव कच्च्या केळीसारखी लागते.शरीरात पाणी कमी झाल्यास त्यावर अनेक जण रानकेळी अर्थात हा लांबलचक कंद खाण्यास पसंती देतात. सध्या सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरच्या डाब आणि देवगोई घाट परिसरात या कंदाची विक्री करण्यात येत आहे.
खरेदीसाठी अनेक जण आवर्जून या मार्गाचा वापर करत आहेत. खोडाच्या वरच्या बाजूला असलेला केळीच्या पानासारखा पाले भाजी म्हणून शिजवून खाल्ल्याचे ही अनेक फायदे आहेत.