भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मंगळवारी (५ डिसेंबर) एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणलं. आता या प्रोपल्शन माड्यूलचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पृथ्वी परिक्रमा करत हे मॉड्यूल पृथ्वीवर परतणर आहे. इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला होता. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. इस्रोची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरली. हे प्रोपल्शन माड्यूल त्याच चांद्रयान-३ चा एक भाग आहे.

इस्रोने २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. त्यानंतर या चांद्रयानातील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावर फिरून तिथल्या तापमानापासून ते पृष्ठभागाबाबतची बरीचशी माहिती इस्रोला दिली. तिथे काढलेले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओदेखील इस्रोला पाठवले. १४ दिवस चंद्रावर संशोधन केल्यानंतर इस्रोची ही मोहीम संपुष्टात आली. कारण हे चांद्रयान सौरऊर्जेवर काम करत असल्यामुळे आणि चंद्रावर रात्र झाल्याने (सूर्यप्रकाशाअभावी) इस्रोचं संशोधनकार्य संपलं. दरम्यान, चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोने आणखी एक यश मिळवलं आहे. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.

चांद्रमोहिमेच्या उत्तरार्धातील या महत्त्वाच्या टप्प्याची माहिती देताना इस्रोनं म्हटलं आहे की, “आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे.” चांद्रयान मोहीम फत्ते करून चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत आलं आहे. हे मॉड्यूल लवकरच पृथ्वीवर उतरेल. ही गोष्ट केवळ चांद्रयान मोहिमेपुरती मर्यादित नाही. कारण यामुळे आता कोणतंही यान अथवा अंतराळवीरास अवकाश मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता इस्रोने सिद्ध करण्याचा पहिला टप्पा इस्रोने पार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या यशाचं कौतुक केलं आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इस्रोची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की, “इस्रोचं अभिनंदन! आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील आणखी एक तांत्रिक मैलाचा दगड आपण गाठला आहे. या ध्येयांमध्ये २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयाला पाठवण्याचं आपलं ध्येयदेखील समाविष्ट आहे.