दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आज दुबईत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. विशेषतः आयसीसी स्पर्धाच्या नॉकआउट सामन्यांमध्ये १४ वर्षांपूर्वी म्हणजे २०११च्या वन-डे विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. तेव्हापासून प्रत्येकवेळी कांगारू टीम इंडियावर वरचढ ठरले आहेत. नॉकआउट सामन्यांमधील हा वनवास संपवण्याची सुवर्णसंधी आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात भारतासमोर चालून आली आहे. त्यामुळे टीम इंडिया १४ वर्षांचा वनवास आज संपवेल का? हे पाहावं लागणार आहे.
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास सध्या दुणावलेला आहे शिवाय संघात दर्जेदार फिरकीपटूंचा भरणा असल्याने ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचे पारडे जड समजले जात आहे.
२०११ च्या वन-डे विश्वचषकातील विजयानंतर भारताला प्रत्येकवेळी नॉकआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचा गड भेदता आलेला नाही. २०१५ वन-डे विश्वचषक उपांत्य फेरीत आणि अलीकडेच २०२३ च्या वन-डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कागारूंनी दिलेला धक्का समस्त भारतीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. रोहित सेनेसमोर सगळ्यात मोठी डोकेदुखी असेल ती ट्रॅव्हिस हेडची, ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या सलामीवीराने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या नाकीनऊ आणलेले आहे तसेच हेडला जर कर्णधार स्टीव्ह स्मिथची साथ मिळाली तर भारतासमोर ऑस्ट्रेलियाला रोखणे कठीण होऊन बसेल. पण ट्रॅव्हिस हेडसाठी काही विशेष रणनीती आखून भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान परतवून लावण्याच्या तयारीत असतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
खेळपट्टीने निर्माण केली आव्हाने
भारतीय संघाला एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा मिळत असल्याचा आरोप कर्णधार रोहित शर्माने फेटाळून लावला. तो म्हणाला, हे काही भारतातील मैदान नाही. प्रत्येक वेळी इथल्या खेळपट्टीने आमच्यासमोर वेगळे आव्हान उभे केले.
आतापर्यंत या स्पर्धेत भारताने दुबईच्या मैदानावर तीन सामने खेळले. या तिन्ही सामन्यांत खेळपट्टीचा नूर वेगळा होता. एकूण चार ते पाच खेळपट्ट्या या मैदानावर आहेत. मला नाही माहिती की, यापैकी कुठली खेळपट्टी उपांत्य सामन्याच्या वेळी वापरली जाणार आहे. याबाबत फार विचार करत नाही.