---Advertisement---
जळगाव : येथील एमआयडीसीचा डी प्लस झोनमध्ये समावेश करण्यासह औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात मुंबई येथील मंत्रालयात उद्योगमंत्र्यांसमवेत बुधवारी (२१ मे) होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बुधवारी (२१ मे) दुपारी अडीचला मुंबई येथील मंत्रालयातील दालन क्रमांक १०१ मध्ये बैठक होणार आहे.
बैठकीला यांची उपस्थिती राहणार
उद्योगमंत्री उदय सामंत अध्यक्षस्थानी असतील. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष मागणीवरून ही बैठक घेण्यात येत आहे. बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आम दार उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एमआयडीसीचा डी प्लस झोनमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहून शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. याच मुद्यावर त्यांनी स्वतः उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा केली होती. त्या वेळी उद्योगमंत्री सामंत यांनी डी प्लस झोनमध्ये समावेशाचा विचार सकारात्मक असल्याचे स्पष्ट करत वचनही दिले होते. परिणामी, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निर्णायक बैठकीकडे लागले आहे.
बैठकीत येथील एमआयडीसीचा डी प्लस झोनमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि औद्योगिक संरचना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. बैठकीत जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारा निर्णय यातून होण्याची शक्यता असल्यामुळे, जिल्ह्याच्या विकासासाठी ते एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.