---Advertisement---
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहेत. आगामी काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनविणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राज्यभरातील महिलांनी पाठविलेल्या हजारो राख्यांचा सोहळा शनिवारी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विरोधक कितीही टीका करीत असले तरी आपण महिलांसाठी सुरु केलेली कोणतीही योजना पुढील पाच वर्षे बंद करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार विद्या ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बहिणींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात 2029 मध्येही आमचेच सरकार सत्तेत येईल. महिलांच्या सहकारी संस्थांना हक्काचे स्थान देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. लाडक्या बहिणींसाठीची योजना बंद होणार असे विरोधक म्हणत असलेत तरी मी आश्वासन देतो की, 2029 पर्यंत लाडक्या बहिणींसाठी असणारी कोणतीही योजना बंद होणार नाही. त्यानंतर आमचे सरकार आले तर या सर्व योजना पुढेही सुरू ठेवल्या जातील.
या राख्या धर्म, जात, पंथाच्या पलीकडच्या आहेत. इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्याकडे आहे, अशा भावाला कुणाचीही भीती नसते. माझ्या लाडक्या बहिणींच्या मताला ‘व्होट चोरी’ म्हणणारेच खरे चोर आहेत. अशा निर्बुद्धांना अक्कल यावी म्हणून माझ्या बहिणींनी त्यांना 25 टक्के आशीर्वाद द्यावेत.
देशातील मातृशक्ती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि महिलांच्या मान-सन्मानासाठी महायुती सरकार नेहमी कार्यरत राहील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.