२०२४मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील काय?; संजय राऊत म्हणाले…

जम्मू : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत जम्मूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. यापार्श्‍वभूमीवर मीडियाशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की, भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान बनतील काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात. कोणताही व्यक्ती देशाचं नेतृत्व करू शकतो. पंतप्रधानपदाबाबत २०२४नंतर ठरवू. लोकांना जर वाटलं राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनावं तर त्यांना बनावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधींची जी भाजपने प्रतिमा तयार केली आहे. ती चुकीची आहे. तुमच्या मनातील राहुल गांधी यांची जी प्रतिमा आहे. ती लोकांनी तोडली आहे. राहुल गांधी ४५०० किमीपेक्षा अधिक अंतर पायी चालत आहेत. हे हिंमतीचं काम आहे. त्याकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही. त्यामुळेच शिवसेना या यात्रेत सामील झाली, असंही त्यांनी सांगितलं. येणार्‍या काळात राहुल गांधी यांचं नेतृत्व चमत्कार करेल. राहुल गांधी हे येणार्‍या काळात आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून आव्हान उभं करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही राजकीय नाही. त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी तिसर्‍या आघाडीच्या प्रयोगाची खिल्ली उडवली. थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही. आज काँग्रेसकडे खासदार कमी आहेत. पण २०२४मध्ये काँग्रेसचे खासदार वाढतील, असा दावाही त्यांनी केला.